विषारी
मराठी : नाग, नागोबा.
विशिष्ट लक्षणे : आकाराने मध्यम, तसेच, मोठेदेखील. शरीर गुळगुळीत, सर्वांगावर चकचकीत खवले; डोके व मान रुंद; मानेखाली रुंद काळा पट्टा, फण्यावर मराठी दहाच्या आकड्यासारखे स्पष्ट चिन्ह असते.
सरासरी लांबी : नराची लांबी 1 मी.; जन्मत: 25 सें. मी.; कमाल: 2 मीटर. वर्णन : नागाच्या अंगावरील खवले गुळगुळीत असतात. त्यांचे डोळे काळेभोर असतात. मान व डोके रुंद असते. शरीराचा आकार मध्यम. सामान्यतः सर्वांग काळे असते. परंतु कधीकधी गर्द तपकिरी, तर कधी पिवळट पांढऱ्या वर्णाचेही आढळून येतात. शरीराच्या खालच्या भागाचा रंग पांढरा किंवा पिवळट असतो. मानेच्या खालच्या बाजूवर काळा रुंद पट्टा असतो. अंगावर पांढरे ठिपके किंवा पिवळ्या रंगाची नक्षी असते. कधीकधी पांढरे ठिपके किंवा पिवळ्या नक्षीऐवजी तुटक तुटक पट्टेही आढळून येतात. फण्यावर अंगठीसारखी दिसणारी दोन चिन्हे असतात. कधीकधी ती चष्म्यासारखी भासतात. काहींना तर तो मराठी दहाचा आकडा असल्याचा भास होतो. काही नागांच्या फण्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते. वायव्य भारतात केवळ काळपट वर्णाचेच नाग आढळतात. मात्र त्यांच्या फण्यावर कोणत्याही प्रकारच्या खुणा नसतात. अनेकदा नागालाच घामण समजले जाते. धामणीचे डोके व मान चपटी असते. तिची लांबी 3 मीटर असते. सर्वांत मोठ्या नागापेक्षा ही लांबी एका मीटरने जास्त असते. भारतात नागाच्या तीन उपजाती आहेत. त्यांपैकी चष्मा नाग सर्वत्र आढळतो. अत्यंत जहाल विष असलेल्या चार सर्पांत नागाचा समावेश होतो. आशिया खंडात नागांच्या सहा तर आफ्रिकेत नऊ उपजाती आहेत. वायव्य भारत व पाकिस्तानात आढळून येणारे कृष्णनाग हे वेगळ्याच उपजातीचे आहेत. काळा रंग आणि चिन्हे नसलेला फणा हे दोन अपवाद वगळता, तो चष्मा नागासारखाच दिसतो.
वितरण : भारतात सर्वत्र समुद्रसपाटीपासून ते हिमालयात 4000 मीटर उंचीपर्यंतही आढळून येतात.
निवासस्थान : भात पिकणाऱ्या प्रदेशात नाग सामान्यपणे आढळून येतात. कारण अशा भातशेतीत उंदीर व घुशी बिळे करून राहतात. त्यामुळे त्यांना राहायला बिळे व खायला उंदीर-घुशी सहज मिळतात. प्राप्त परिस्थितीशी जुळवून राहण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे अगदी शुष्क प्रदेशातही ते सापडतात. नाग प्रामुख्याने धान्याची कोठारे, वारुळे, मातीचे बांध व दगडांचे ढीग यांत आवडीने राहतात. ज्या भागात घुशींचे प्रजनन अधिक होते, त्या भागात चष्मा नागाचेही प्रजनन अधिक प्रमाणात होते.
सवयी : खेड्यातील शेतीच्या परिसरातील उंदीर-घुशींच्या बिळांत ते सामान्यतः राहतात. ते शक्यतोवर माणसांचा संपर्क टाळतात. डिवचले असता, चवताळून ते तत्काळ फणा काढतात. त्यांची फणा व फण्यावरील अत्यंत तेजस्वी डोळे पाहून पाहणाऱ्याला त्यांची भयंकर भीती वाटते. फारच चवताळले, तर संतापाने गळ्यातून हिस् हिस् असा आवाज काढतात. आफ्रिकेतील नागाच्या काही उपजातीफूत्कार करतात किंवा सुमारे 2 मीटर लांब अंतरापर्यंत हवेतून सहज विष फेकतात. ईशान्य भारतातील नागदेखील असेच कमी अंतरापर्यंत हवेतून विषाचा फवारा सोडतात. सायंकाळी ते भक्ष्यशोधार्थ बाहेर पडतात. इतर जातीच्या सर्पाप्रमाणे नागदेखील पावसाळ्यात अधिक क्रियाशील असल्याचे दिसून येते.
वीण : मे व जुलै महिन्यांत नागीण 12-30 अंडी उंदराच्या बिळात अथवा वारुळात घालते. हा काळ स्थळाप्रमाणे बदलत जातो. अंड्यांतून पिले बाहेर येण्याला साधारणतः साठ दिवस लागतात. तोपर्यंत अंड्यांचे संरक्षण करीत ती तिथेच अन्नपाण्यावाचून राहत असते. पिलेदेखील मोठ्या नागासारखीच दिसतात. एक-दोन आठवड्यांनंतर ती तेथून दुसरीकडे निघून जातात. सामान्यतः नागीण एकाच ठिकाणी आपली सर्व अंडी घालते. कधीकधी एकाच ठिकाणी सर्व अंडी न घालता तिने एकापेक्षा अधिक ठिकाणीही घातल्याचे आढळून येते. नाग, तसेच, इतर अन्य सर्पाची वीण बहुतेक एक वर्षानंतर होते.
भक्ष्य : लहान पिले कीटक, सरडे, बेडूक, मंडूक व लहान साप यांवर गुजराण करतात. जसजशी ती मोठी होऊ लागतात, तसतशी ती कृंतक प्राणी, बेडूक, मंडूक व पक्षी यांवरही प्राधान्यक्रमाने उपजीविका करतात. नाग घोरपडीला गिळताना पाहिले आहेत. एकदा जबड्यात भक्ष्य पकडले, की त्याची हालचाल बंद होईपर्यंत ते त्याला घट्ट पकडून ठेवतात.
स्थिती : नाग ज्या ज्या भागात राहतात, तेथे त्यांची कातड्यासाठी हत्या केली जाते. 1973 सालापासून नागांच्या कातड्यांच्या निर्यातीवर भारत सरकारचे नियंत्रण आहे. तरीही त्यांच्या कातड्यांचा अवैध व्यापार आजही सुरळीतपणे चालू आहे. कातडी कमावण्याच्या कारखान्यात दररोज हजारो कातड्यांची उलाढाल होते. नागांना शेतजमिनीत राहावयाला विशेष आवडते. अशा जमिनीला असलेल्या वनांचे शेतजमिनीत रूपांतर करणे त्यांच्या वास्तव्याला अधिक ठरावे..
विष : नागाच्या विषाचा परिणाम मज्जातंतूंवर होऊन परिणामतः श्वसनक्रिया व हृदयक्रिया बंद पडते. त्याच्या विषाने तत्काळ मृत्यू होत नाही. त्याचे विष हळूहळू शरीरात भिनत जाते. नागाने दंश केला, तर त्यावर त्वरित उपाय करावा. नागाच्या विषावर विस्तृत स्वरूपाचे संशोधन चालू आहे. मुंबईतील टाटा मेमोरिअल कॅन्सर संस्थेने नागाच्या विषांवर संशोधन केले असता, असे आढळून आले, की उंदरांच्या शरीरातील काही कर्कपेशी नागाच्या अत्यल्प विषाने नष्ट होतात. तसेच, अत्यंत वेदनाशामक औषधे नागाच्या विषापासूनच तयार केली जातात. उदाहरणार्थ, ‘कोब्राक्सिन’ व नायलोक्सिन (हायनसन, वेस्कॉट व डुनिंग, यूएस्ए )
Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.