बिन विषारी
मराठी : धामण.
विशिष्ट लक्षणे : मोठी, अंगावर चकचकीत खवले, पाठीवरचे खवले कणेदार, : चिंचोळी मान व मोठे डोळे.
सरासरी लांबी : नराची 2 मी.; जन्मतः 32 सें. मी.; कमाल : 3.5 मी.
वर्णन : बहुतेक सर्वत्र आढळून येतात. धामण जातीचे साप एकाच रंगाचे नसून, निरनिराळ्या रंगांचे असतात. पठारी भागातील या जातीचे साप फिकट पिवळ्या रंगाचे, तर डोंगराळ भागातील या जातीचे साप काळ्याभोर रंगाचे असतात. त्यांच्या अंगांवर हिरव्या अथवा तपकिरी रंगाच्या अनेक छटा दिसून येतात. डोक्यापासून शेपटीपर्यंतच्या अंगाचा रंग एकच असतो. पाठीवरील खवल्यांच्या कडा काळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या असतात. ह्या रंगीत कडांमुळे संपूर्ण पाठीवर एक प्रकारची चौकोनी जाळी असल्यासारखी दिसते. पाठीवरील ही चौकोनी जाळी तो जेव्हा स्वत:च्या बचावासाठी फूत्कार टाकतो त्या वेळी प्रामुख्याने स्पष्टपणे दिसून येते.. शरीराच्या खालील भागावर आडवे ठळक पट्टे असतात. तसेच, उत्तर भारतातील या जातीच्या सापांच्या शरीराच्या खालच्या भागावर लहान लहान आडवे ठळक पट्टे असतात. त्यांच्या खालच्या ओठावर आडव्या काळ्या रेघा असतात. प्रथमदर्शनी धामण हुबेहूब नागासारखीच दिसते, परंतु ती नागापेक्षा अधिक लांब असून, तिथे शरीरही सडपातळ असते; तसेच, तिचे डोके निमुळते असून, डोळे आकाराने मोठे व बटबटीत असतात. नागाचे डोके मात्र गोलाकार असते. नाग आणि घामण यांना स्वतंत्रपणे ओळखता यावे, याकरिता त्यांचे डोळे, डोके आणि मान यांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वितरण : हे साप अंदमान व निकोबार बेटांसह भारतात समुद्रसपाटीपासून 4000 मीटर उंचीपर्यंत सर्वत्र सापडतात.
निवासस्थान : कोणत्याही वातावरणात राहू शकणारा हा साप सर्वत्र सहज संचार करतो. घुशीची बिळे ही त्यांची आवडती वसतिस्थाने आहेत. उंच गवताळ प्रदेश, भातशेती व धान्यांची गोदामे या ठिकाणी राहून ते आपल्या भक्ष्याचा शोध घेत असतात.
सवयी : उंदीर आणि घुशी हे या सापांचे अत्यंत आवडते भक्ष्य आहे. उंदीर व घुशी यांचे वास्तव्य मनुष्यवस्तीत अधिक प्रमाणात असल्यामुळे इतर सापांपेक्षा धामण साप गावात अधिक प्रमाणात दिसून येतात. बहुधा ते दिवसाच बाहेर पडतात. माणसांची रहदारी ज्या भागात असते, असा भाग टाळून ते अन्यत्र भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असतात. भक्ष्य सापडले, म्हणजे ते खाताना कोणी पाहू नये याची ते विशेष खबरदारी घेतात. डिवचले असता ते चवताळून डोके उंच करून गळा फुगवितात व संतापाने डसण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी ते हिस् हिस् असा फूत्कार टाकतात. त्यांचा दंश विषारी नसला, तरी त्यापासून तीव्र वेदना होतात. नागराजाशी साम्य असलेला हा सर्प चवताळला, तर गुरगुर असा आवाज काढतो.
वीण : मादी मार्च ते जुलै महिन्यांत 8 ते 16 अंडी घालते. कधीकधी ती हिवाळ्यातही अंडी घालते. अंडी अंदाजे साठ दिवसांनी उबतात.
भक्ष्य : धामण सपचे मुख्य भक्ष्य कृतक जातीचे प्राणी असले, तरी ते बेडूक, सरडे, पक्षी व लहान सापसुद्धा खातात. या सापाची लहान पिले मात्र बेडकांवरच गुजराण करतात. ही पिले साधारणत: एक वर्षाची झाली, की ती उंदीर-घुशींची शिकार करू लागतात. या जातीचे साप आपले भक्ष्य जिवंत आणि सगळेच्या सगळे गिळतात. भक्ष्याभोवती वेटोळे घालून व त्याला घट्ट आवळून मारतात. तसेच, जबड्यात धरूनही ते त्यांना ठार करतात.
स्थिती : धामण व नाग यांच्या कातड्यांचा उद्योग फार पूर्वीपासून अनियंत्रित असा चालत आला आहे. ज्या भागात ते पूर्वी विपुल प्रमाणात होते, त्या भागात ते आज नामशेष झाले आहेत. त्यामुळे त्या भागातील मुशी व उंदरांची संख्या वाढली आहे. बरेच आदिवासी या सापांची कातडी गोळा करून ती विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळेही या जातीच्या सापांची हत्या फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र होत असते. तिला निर्बंध घालणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता एक उपाय अमलात आणता येण्यासारखा आहे. एखाद्या क्षेत्रात या सापांची दरवर्षी किती वाढ झाली, याचा अभ्यास करण्यात यावा व त्यानुसार केवळ वाढ झालेल्या सापांच्या संख्येइतकेच साप पकडले जावेत, असे झाले, तर या जातीच्या सापांची संख्या कायम राहील आणि आदिवासींनाही उपजीविकेचे साधन मिळू शकेल. तसेच, उंदीर आणि घुशींच्या अमर्याद संख्येवर नियंत्रण राहून शेतमालाची नासाडीही थांबविता येईल. (हे पुस्तक लिहिताना भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयाने सापाच्या कातडीच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली होती; परंतु या नियमाचे पालन न होता देशात हा व्यवसाय आजही अनिर्बंध चालू आहे).
Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.