उडता सोनसर्प (फ्लाईंग स्नेक ) क्रिसोपेलिया आर्नेटा (Chrysopelea ornata)

निम्न विषारी

मराठी : तिडक्या साप, उडता साप, उडता सोनसर्प.

विशिष्ट लक्षणे : लहान, तसेच, मध्यम आकाराचा, अंगाने काठीसारखा गोल, पाठीवर गुळगुळीत खवले, तसेच काळ्या, पिवळ्या व तांबड्या रंगाची चकचकीत नक्षी.

सरासरी लांबी : 1 मी. जन्मत: 20 सें. मी.; कमाल : 1.75 मीटर.

वर्णन : अंगाने सडपातळ, चपळ आणि रंगीबेरंगी उडता सोनसर्प एखाद्या विजेसारखा दिसतो. त्याची पाठ काळी असते. त्यावर पिवळे किंवा पांढरे आडवे पट्टे व ठिपके असतात. त्यांवर तांबडी सुंदर नक्षी असते. खालचा भाग हिरवट असतो. सरपटताना त्याच्या पोटाकडील बाजूच्या खवल्यांना घड्या पडतात. झाडावर चढण्यासाठी त्याला अशा खवल्यांचा उपयोग होतो. डोक्यावरही चकचकीत पट्टे असतात. डोके व अंगावरील ही नक्षी देशपरत्वे निराळी असते. खवले गुळगुळीत असून, ते किंचित उजळ असतात.

वितरण : भारताच्या नैर्ऋत्य व ईशान्य भागांतील पर्वतीय वने, तसेच, उत्तर बिहार आणि ओरिसा, समुद्रसपाटीपासून 2000 मीटर उंचीपर्यंत ते आढळून येतात. पॅरेडाइज फ्लाइंग स्नेक (C. Paradisi) नावाची उपजात अंदमान बेटातील नारकोश डॅम येथे आढळून येते.

निवासस्थान : हे साप उंच व मोठी झाडे, तसेच, घनदाट जंगलात राहतात. श्रीलंका व थायलंड या भागांत मात्र ते घरासमोरच्या बागेत दिसून येतात.

सवयी : ते दिवसाच बाहेर पडतात. शत्रूपासून स्वतःचा बचाव करून घेण्याकरिता उड़ते सोनसापदेखील झाडसापाप्रमाणेच झाडाच्या फांद्यांवरून उड्या घेतात. या सापाच्या उडण्याच्या पद्धतीचे चित्रीकरण करून, त्यावर अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. ते आपले अंग ताणतात व पोट आत ओढून घेतात. अवयव ताणल्यामुळे बिनयंत्री आकाशयानाप्रमाणे ते संघ गतीने उडत उडत वरून खाली येतात. त्यामुळे इतर सापांप्रमाणे धपकन खाली पडत नाहीत. हा साप एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सहज उडत जातो, ते पाहून आपणांला आश्चर्य वाटते.

वीण : एम. ए. स्मिथ या सर्पतज्ज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे या जातीची मादी 6 ते 12 अंडी घालते. बंगालमध्ये ते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात अंडी घालतात.

भक्ष्य : झाडसाप व उडता सोनसर्प यांच्या सवर्दीत बरेच साम्य आहे. ते बेडूक, सरडे, पाली, लहान पक्षी आणि त्यांची अंडी यांवर गुजराण करतात. ते जिवंत भक्ष्य गिळतात. त्यांच्या मुळ्यासारख्या पुढील दातांतील किंचित विषयुक्त लाळेमुळे भक्ष्याची हालचाल बंद होते.

स्थिती : पश्चिम घाटात तामिळनाडूतील कलक्काड येथे आम्हांला या सर्पाचा एकच नमुना सापडला. त्या भागात ते दुर्मीळ असावेत. बंगालमध्ये या जातीचे जिवंत सर्प बाजारात विकले जातात. युरोप व अमेरिकेतील सर्पशौकिनांत हा साप बराच प्रसिद्ध आहे. त्यामुळे पूर्वी त्यांची मोठ्या प्रमाणात परदेशांत निर्यात होत असे. हे साप अत्यंत विषारी असल्याचा निर्वाळा देताना गारुडी म्हणतात की, साप जेवढे रंगीबेरंगी असतात, तेवढे ते अत्यंत जहरी असतात. फक्त धाडसी माणसेच त्यांना हाताळू शकतात.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *