निम्न विषारी
मराठी : झाडप्या सर्प, मांजऱ्या सर्प
विशिष्ट लक्षणे : आकाराने लहान, तसेच, मध्यम. काठीसारखे वासाने गोल. वरील भागावर गुळगुळीत खवले. मान सडपातळ, बटबटीत डोळे, चपटे डोके, सर्वांगावर ठळक नक्षी.
सरासरी लांबी : मादी 65 सें. मी. जन्मत: 25 सें. मी.; कमाल: 1.25 मीटर.
वर्णन : लांब शरीर व निमुळती होत गेलेली टोकदार शेपटी. या जातीचे साप अंगाने सडपातळ असतात. त्यांचे शरीर व शेपटीही त्यामानाने लांब असते. शेपटी निमुळती होत होत शेवटी ती अत्यंत बारीक झालेली असते. वरील रंग फिकट – तपकिरी किंवा पिंगट असतो. त्यावर गर्द रंगाच्या खुणा असतात. डोक्यावर Y आकाराचे चिन्ह असते. शरीराच्या खालच्या भागाचा रंग पांढुरका किंवा पिंगट असतो. पोटावर खवले असतात. कधीकधी पोटावरील प्रत्येक खवल्यावर बारीक बारीक ठिपके असल्याचेही आढळून येते. खतले गुळगुळीत असतात, पण ते रंगाने मंद असतात. मांजऱ्या साप व फुरसे यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे या सापांनाही फुरसे समजण्याची अनेकदा गल्लत होते. साप पकडणारे महाराष्ट्रातील महार त्यांना मोठे फुरसे म्हणतात. मांजऱ्या सर्प जाड फुरशापेक्षा लांब व सडपातळ असतो. भारतात या सर्पाच्या अकरा उपजाती आहेत. मांजऱ्या सर्पाव्यतिरिक्त या जातीचे इतर साप डोंगराळ प्रदेशात आढळतात. त्यांपैकी फॉरस्टेन मांजच्या सर्प 2 मीटर लांब असतो. अंदमान मांजऱ्या सर्प फक्त अंदमान व निकोबार बेटांतच दिसून येतो.
वितरण : भारतात सर्वत्र पठारी प्रदेशात आढळून येतात. हिमालयातला मांजऱ्या सर्प मात्र समुद्रसपाटीपासून 3000 मीटरपर्यंत सापडतो.
निवासस्थान : मांजऱ्या सर्पाला तामिळनाडू भागात ताडपान साप म्हणून ओळखतात. कारण ते दिवसा बहुतेक ताडाच्या पानांत वेटोळे घालून बसलेले असतात. दिवसा कित्येक वेळा ते झुडपे, गवताने शाकारलेली घरांची छपरे किंवा झाडांच्या सालीखाली थंडाव्याला राहतात.
सवयी : रात्रिचर सापांचे डोळे मांजरासारखे बटबटीत असतात. त्यांची जीभही पिसासारखी लांब असते. या जातीच्या सापांचे डोळे व जीभ तशीच असल्यामुळे हे सापदेखील रात्रिंचर असावेत, असे वाटते. या सापाचे विष सौम्य असते. त्यामुळे त्याने पकडलेले भक्ष्य निपचीत पडून राहते. ते पूर्णपणे मरत नाही. या जातीचे साप निरुपद्रवी आहेत. मात्र चवताळले, की सर्वांगाचे पट्ट वेटोळे करून त्यातून डोके आणि त्याच वेळी शेपटीही थरथर हलवीत असतात. त्यांना टोचले, तर ते उलटे होऊन निपचीत मृतवत पडून राहतात. निदर्शनास आले.
वीण : मद्रास येथील सर्पोद्यानात मांजऱ्या सापाने ऑक्टोबरमध्ये 7 अंडी घातल्याचे निदर्शनास आले.
भक्ष्य : प्रामुख्याने सापसुरळी व इतर प्रकारचे सरडे. कधीकधी ते उंदीर व लहान पक्षीही खातात.
स्थिती : दक्षिण भारतातील बऱ्याच भागांत ते सामान्यपणे आढळून येतात. नजरेत न भरणाऱ्या इतर सापांप्रमाणे किंवा रात्री हिंडणाऱ्या सर्पाप्रमाणे कचितच दृष्टीस पडतात.
Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.