झाडसाप (ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक ) डेन्ड्रेलाफिस ट्रिसटिस (Dendrelaphis tristis)

बिन विषारी

मराठी : जंगली साप, झाडसाप, अहिसाप.

विशिष्ट लक्षणे : हे साप आकाराने मध्यम व काठीसारखे गोल असतात. खवले गुळगुळीत असतात. डोक्यापासून शेपटीपर्यंत तपकिरी किंवा काशा वर्गाची रुंद पट्टी असते.

Source Internet

सरासरी लांबी : 1 मी.; जन्मत: 15 सें. मी.; कमाल : 1.5 मीटर,

वर्णन : झाडसाप काठीसारखे गोलाकार व लांब असतात. त्यांचे डोके रुंद व डोळे मोठे असतात. डोक्यापासून शेपटीपर्यंत लांब फिक्कट काशा वर्णाची पट्टी असते व तिची किनार गर्द तपकिरी किंवा काळी असते. खालचा भाग पांढुरका, राखी किंवा फिक्कट हिरवा असतो. पिलेदेखील मोठ्या सापासारखीच दिसतात. त्यांच्या अंगावरही फिक्कट काशा रंगाचे पट्टे असतात. पोटाखालच्या खवल्यांना खाचा असतात. त्यांमुळे या सापाच्या अंगावर घड्या निर्माण होतात. या घडीचा उपयोग त्यांना झाडावर चढताना होतो. भारतात झाडसापांच्या आठ उपजाती आहेत. त्या उपजाती बहुतेक जंगलातील डोंगराळ भागात आढळून येतात.

वितरण : हे साप अंदमान व निकोबार बेटांसह भारतात सर्वत्र आढळतात. समुद्रसपाटीपासून 2000 मीटर उंचीपर्यंत हिमालयातही आढळून येतात.

निवासस्थान : हे साप झाडांच्या आश्रयाने राहतात. लहान झुडपे, बाभळीसारखी काटेरी झाडे, तसेच, ताडाच्या आणि माडांच्या झाडांवरही राहतात.

सवयी : झाडसाप मोठे चपळ असतात. मान व इतर शरीराची हालचाल एका लयीत असते. ते दिवसाच बाहेर पडतात. उन्हाळ्यात भर दुपारीदेखील हिंडताफिरताना आढळून येतात. झाडसाप चवताळले, म्हणजे अंग फुगवितात. त्या वेळीच त्यांच्या पाठीवरील पांढरे किंवा निळे खवले स्पष्टपणे नजरेस पडतात. ते झड़प घालून सफाईने दंश करतात. परंतु काळजीपूर्वक हातात धरले असता मवाळ होतात. इतर सर्पाप्रमाणे झाडसापाला झाडावरून खाली पडण्याची भीती वाटत नाही. ते झाडावर राहून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सहज संचार करतात. 10 ते 20 मीटर उंच झाडावरून ते जमिनीवर चपळाईने उडी घेतात. ते बहतेक उघड्यावर राहतात. सापाची ही जात कोणालाही न भिणारी आहे. त्यामुळे लपून राहण्याचा त्याचा स्वभाव नाही.

वीण : झाडसापाची मादी झाडाच्या ढोलीत अथवा पक्ष्यांनी सोडून दिलेल्या घरट्यात अंदाजे 6 अंडी घालते. अंडी आकाराने लांब व चपटी असतात. मद्रास येथील सर्पोद्यानात एका मादीने 6 एप्रिल रोजी 7 अंडी घातली व ती तीस दिवसांनी उबवली.

भक्ष्य : हे साप मुख्यतः बेक व सरडे खातात. झाडांवर राहणाऱ्या बेडकांची शिकारही करतात. झाडसाप गवताने शाकारलेल्या छपरातील पालींच्या शोधार्थ फिरत असताना त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या नजरेस पडतात, तेव्हा माणसे त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.

स्थिती: सामान्य.

टीप : या निरुपद्रवी सापाविषयी अनेक गैरसमज आहेत; आणि या गैरसमजांचा प्रसारही करण्यात आला आहे. तामिळनाडू भागात त्याच्याविषयी एक समज असा आहे, की हा साप माणसाला दंश करून उंच झाडावर चढतो आणि दंश केलेल्या माणसाची प्रेतयात्रा तेथून पाहतो.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *