मण्यार (कॉमन क्रॅट) बंगारस कॅरुलियस (Bungarus caeruleus)

विषारी

मराठी : मण्यार

विशिष्ट लक्षणे : मध्यम आकाराचा, गुळगुळीत, शरीरभर चकचकीत खवले, डोके व मान वगळून अंगावर कमानीसारखे आडवे पांढरे पट्टे, मानेपेक्षा डोके किंचित रुंद, काळा रंग.

सरासरी लांबी : नर 1 मी. जन्मत: 25 सें. मी.; कमाल: 1.75 मीटर.

वर्णन : मण्यारचे शरीर गुळगुळीत असते. त्याच्या वरील अंगाचा रंग निळसर काळा असतो व तो चकचकीत असतो. डोके गोल व मानेपासून किंचित वेगळे असते. नुकत्याच कात टाकलेल्या या सापाच्या अंगाचा रंग चकचकीत निळा काळा असतो. या जातीच्या सापांचा रंग काळा असला, तरी कात टाकण्यापूर्वी तो पिवळट व फिक्कट निळसर राखी होतो. त्याच्या अंगावर कमानीसारखे अंदाजे चाळीस आडवे पांढरे बारीक पट्टे असतात. मोठा मण्यार व लहान पिले यांच्या मान व डोक्याजवळच्या भागात कधीकधी पट्ट्यांऐवजी पांढरे ठिपके असल्याचे आढळून येते. डोके व मानेवर पांढरे ठिपके असणारे, तसेच, रंगातही बदल होणारे या जातीचे साप भौगोलिक वितरणाप्रमाणे भिन्न भिन्न वैशिष्ट्यांचे असतात. या सापाच्या खालील अंगाचा रंग पांढरा असतो. कवड्या सापदेखील प्रथमदर्शनी मण्यारासारखाच दिसतो. परंतु कवड्या साप अंगाने लहान असून, त्याचे डोके चपटे व टोकदार असते. भारतात आढळून येणाऱ्या मण्यार सर्पाच्या सहा उपजातींपैकी सामान्य मण्यार सर्वपरिचित आहे. चार भयंकर विषारी सर्पांत मण्याराचाही समावेश होतो. मण्यार व आगी मण्यार यांशिवाय मण्यार सापांच्या उपजाती दुर्मीळ असून, त्या केवळ पूर्व हिमालय आणि आसाम भागातच आढळून येतात.

वितरण : अंदमान व निकोबार बेटासहित भारतात बहुतेक सर्वत्र समुद्रसपाटीपासून : 1700 मी. उंचीपर्यंत आढळून येतात, आणि मण्यार बंगाल, आसाम व ओरिसा या प्रदेशांत सापडतात. मण्यार मात्र कचितच दिसून येतात.

निवासस्थान : रेताड जमीन, वाळवींची वारुळे, लहान कुंतक प्राण्यांची बिळे, व विटांच्या भट्टया, दगडांचे ढीग ही मण्यारांची राहण्याची आवडती स्थाने आहेत. मण्यार हे प्रामुख्याने सपाट प्रदेशातील साप आहेत. या जातीच्या सापांचे वास्तव्य सामान्यपणे काही प्रदेशांत असले, तरी त्या भागातही ते क्वचितच नजरेस पडतात. उदा., तामिळनाडूचा समुद्रकिनारा.

सवयी : रानउंदीर व मेट्टाडे (मेटॅड रॅट) यांच्या बिळांत मण्यार विशेषकरून राहतात. मण्यार रात्रिंचर आहेत. दिवसा ते फिरताना सहसा दिसत नाहीत. एक नर मण्यार आपल्या क्षेत्रात दुसऱ्या नर मण्याराला प्रवेश करू देत नाही. यासाठी तो आपल्या क्षेत्राचे सतर्कतेने रक्षण करतो. दोन नर मण्यार एकत्र कधीच राहू शकत नाहीत. एक नर मण्यार असलेल्या पिंजऱ्यात दुसऱ्या नर मण्याराला सोडले, तर ते एकमेकांना हिसके देऊन रागाने बेभान होऊन डोलू लागतात. कित्येकदा ते एकमेकांना डंखही मारतात. मण्याराचे विषाचे दात आखूड असतात. त्यांची पकड मात्र एखाद्या बुलडॉगप्रमाणे घट्ट असते. दिवसापेक्षा रात्री त्यांचा वेग अधिक असतो. तसेच, ते रात्रीचे इतस्ततः संचार करतात.

वीण : मद्रास भागात मादी 8 ते 12 अंडी मार्च ते मे महिन्यांत घालते. साधारणपणे मे – जुलैमध्ये अंड्यांतून पिले बाहेर पडतात. नागिणीप्रमाणेच मण्याराची मादीही आपल्या अंड्यांभोवती फिरून त्यांचे संरक्षण करीत असते.

भक्ष्य : मुख्यत्वे साप, सरडे व कृंतक प्राणी. मण्यार या जातीचे साप स्वजातिभक्षक आहेत. बंद करून ठेवलेल्या मण्यार सापांपैकी काही लहान मप्यार गायब झाल्यास त्याचे आश्चर्य वाटू नये. कारण मोठ्या मण्यारांनी ही लहान पिले खाल्लेली असतात. पट्टेरी पाणसाप व साधा गवती साप हे मण्याराचे आवडते भक्ष्य आहे.

स्थिती : सामान्य मन्यार काही भागांत विपुल दिसून येतात. माणसांच्या वस्तीजवळ राहून ते मोठे होत असले, तरी त्यांच्या रात्रिचर स्वभावामुळे त्यांना वर्दळीचा मुळीच उपसर्ग होते नाही. त्यामुळे ते तेथे शांतपणे राहू शकतात.

विष : मण्यारांचे विष अत्यंत जहाल आहे. त्यांचा दंश झाल्यास पक्षापात होतो. दंश झाल्याची कोणत्याही प्रकारची बाह्य लक्षणे लगेच दिसून येत नसल्यामुळे रोग्याच्या पक्षाघाताच्या कारणाची तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. मण्याराच्या दंशामुळे पक्षाघात झाल्याचे आढळल्यास रोग्यावर प्रतिविष लशीचा त्वरित उपचार करण्यात यावा.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *