साधा गवती साप (ग्रीन कीलबॅक)
मॅक्रोपिस्थोडान पुंबीकलर (Macropisthodon plumbicolor)

बिन विषारी

मराठी : साधा गवती साप.

विशिष्ट लक्षणे : मध्यम आकार, सर्व अंगभर कणेदार खवले, गवतासारखा हिरवा. डिवचले असता मान पसरण्याचे विशेष वैशिष्ट्य. त्यामुळे पसरलेली मान लांबून फण्यासारखी दिसते आणि त्यावर v अशी आकृती असलेले विशिष्ट चिन्ह उमटते.

Source Internet

सरासरी लांबी : 55 सें. मी.; जन्मत: 7.5 सें. मी.; कमाल 80 सें. मी.

वर्णन : गवती साप हा रंगाने हिरवाकंच असतो. त्याच्या हिरव्याकंच अंगावर उभ्या, आडव्या, तुटक अशा काळ्या रेषा असतात. डोळे आणि मानेवर बाणाकार उभी स्पष्ट आकृती दिसते. डिवचल्यावर हेच चिन्ह त्याच्या फण्यावरही दिसते. दाट कणेदार कातडीचा रंग चकचकीत असतो. डोके रुंद असते. डोळे मोठे आणि बुबुळे गोल असतात. पोटाखालचा भाग राखी पांढरा असतो. पिले अत्यंत उजळ वर्णाची असतात. (पाहा : वीण)

वितरण : समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवरच्या जंगलांत भारतात सर्वत्र आढळतात.

निवासस्थान : सदाहरित अशी घनदाट जंगले असलेला पहाडी मुलूख व पठारी भागात बहुतेक सर्वत्र दिसून येतात. तसेच पानगळीच्या विरळ जंगलांतही सापडतात.

सवयी : या सर्पाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. डिवचले असता तो इतर सर्पाप्रमाणेच इंग्रजी S सारखे शरीराचे वेटोळे करून, अंग आक्रसून घेतो. फारच त्रास दिला, तर आपल्या शरीराचा पुढील भाग उभा करून फणा काढतो. एम्. ए. स्मिथ यांच्या म्हणण्याप्रमाणे हा सर्प पूर्णपणे निरुपद्रवी स्वभावाचा आहे. या सापापासून माणसाला कोणत्याही प्रकारची भीती नाही.

वीण : मादी अंदाजे 12 अंडी घालते. आठ महिने ते एक वर्षापर्यंत पिले अधिक उजळ असतात. त्यांच्या अंगावर उभे आडवे काळे पट्टे व चित्रविचित्र ठिपके असतात. मानेवरील चिन्हेदेखील ठळक दिसतात.

भक्ष्य : इतर भक्ष्यांपेक्षा गवती सापाला मंडूक (टोड) अधिक आवडतात. या सापाचेही दात आकड्यासारखे असतात. त्यामुळे त्याला त्यांच्या साहाय्याने सावज सहज पकडता येते.

स्थिती : सामान्य नसला, तरी सर्वत्र आढळून येतो. त्यांना राहायला अनुकूल असलेली वनांची निवासस्थाने सध्या कमी होत आहेत.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *