विषारी
मराठी : फुरसे
विशिष्ट लक्षणे : आकाराने लहान, शरीराच्या वरील भागावर कणेदार खवले मानेपेक्षा डोके रुंद मंद वर्णाचा. डोक्यावर बाणाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह.

सरासरी लांबी : दक्षिण भारतात : 30 सें. मी, उत्तर भारतात : 50 सें. मी.; जन्मतः 8 सें. मी.; कमाल : 80 सें. मीटर.
वर्णन : शरीराच्या वरील भागावर खरबरीत खवले असतात. मानेपेक्षा डोके बरेच मोठे असते. शरीर जाडगेले असते. पाठीवरील खवले कणेदार असतात. अंगाचा रंग तपकिरी, राखट किंवा रेतीसारखा असतो. त्याचबरोबर पाठीवर अस्पष्ट पांढरे ठिपके असतात. डोक्याच्या मध्यभागी बाणासारखी दिसणारी आकृती असते. पोटाचा रंग पांढरा असतो व त्यावर पिंगट ठिपके असतात. शरीराच्या मानाने शेपूट फारच आखूड असते व ते एखाद्या खुंटासारखे दिसते. चार अत्यंत विषारी सर्पांपैकी फुरसे लांबीने सर्वांत लहान असते. फुरशांच्या लहान आकारामुळे दक्षिण भारतातील लोकांना त्यांच्यापासून कोणताही धोका वाटत नाही; परंतु उत्तर भारतातील फुरसे अंगाने अधिक जाडगेले व लांब असल्यामुळे ते अधिक धोकादायक असते. म्हणूनच चार मोठ्या विषारी सापांत केलेली त्याची गणना योग्य वाटते.
वितरण : हे साप भारतात सर्वत्र आढळून येत असले, तरी पठारी भागात ते अधिक प्रमाणात आढळतात. भारतातील वायव्य भागात फुरसे 2000 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगराळ प्रदेशात दिसून येतात. महाराष्ट्रात रत्नागिरी, तसेच पंजाबचा काही भाग, राजस्थान, तामिळनाडू व आंध्र प्रदेशात ते विपुल प्रमाणात आढळून येतात.
निवासस्थान : सपाट प्रदेशातील ओसाड, रेताड किंवा खडकाळ भागांत विशेष आढळून येतात. वनप्रदेश व उंच पर्वतांवर मात्र फारसे आढळत नाहीत. दगडाखाली, झाडांच्या सालींत, काटेरी झुडपे व इतर ओसाड जागेत फुरसे अधिक आढळून येतात. जांभी जमीन व डबर, छोट्या छोट्या टेकड्यांवरील झुडपी जंगले व ओसाड प्रदेश ही त्यांची विशेष निवासस्थाने आहेत; कारण त्यांचा रंग था. वातावरणाशी एकरूप होत असल्यामुळे ते सहसा नजरेस पडत नाहीत.
सवयी : प्रामुख्याने रात्रिचर असल्यामुळे दिवसा फुरसे क्वचितच दिसतात. रात्री पाऊस आणि गारठा पडला तर मात्र दुसऱ्या दिवशी ऊन पडले, की ती बाहेर पडतात. ती उन्हे खात पडलेले दिसतात. कधीकधी उन्हाने तापलेले रस्ते व पाऊलवाटांवर अंधार पडताच दिसून येतात. त्याच्या पाठीच्या दोन्हीही कडांच्या बाजूचे खवले खरबरीत व धारदार असल्यामुळे ते जेव्हा फिरत असते, त्यांच्या घर्षणापासून ‘फुसफुस’ असा आवाज होतो. इतर साप चवताळले, म्हण जसा तोंडाने फूत्कार सोडतात, तसे हे खवल्यांच्या घर्षणाने आवाज करून भीती निर्माण करते. यावरूनच त्याचे मराठी व हिंदी नाव फुरसे हे पडले आहे.
वीण : एप्रिल व ऑगस्ट महिन्यांत मादी 4 ते 8 पिलांना जन्म देते. दक्षिण भारतात मात्र मादी एका वर्षात दोनदा विते. भारतातील फुरशाची प्रत्येक मा दरवर्षी विते किंवा नाही. याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. भक्ष्य उंदीर, सरडे, बेडकी, विंचू व कृमिकीटकांवर गुजराण करतात. त्यांच्या वितरणाच्या क्षेत्रात भरपूर प्रमाणात सापडतात. स्थिती: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात फुरशांची संख्या फार जास्त असल्याने विप्रतिबंधक लस तयार करण्यासाठी हाफकिन संस्थेमार्फत हे साप अधिक प्रमाणात गोळा केले जातात.
विष : फुरशांचे वास्तव्य असलेल्या भागात फुरसे चावल्याच्या घटना अधिक प्रमाणात घडून येतात. सामान्यतः चावणारे फुरसे लहान असल्यामुळे त्याच्या दंशाने सुदैवाने फारशी प्राणहानी होत नाही. रत्नागिरी येथील एका डॉक्टरने दहा वर्षांच्या काळात पुरशांचा दंश झालेल्या तीनशे लोकांपैकी फक्त दोनच व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे सांगितले. फुरसे चावले, की त्या व्यक्तीचे रक्त त्वरित गोठून जाते. तसेच, रक्तपेशीवरही विषाचा परिणाम होऊन रक्तस्राव होऊ लागतो. यावर त्वरित औषधोपचार करण्यात आला नाही, तर रक्तस्रावाचा आजार असलेल्या रोग्यांसारखीच फुरसे चावलेल्यांची स्थिती होते. रोगी सहसा लवकर दगावत नाही. या काळात रोग्याला विषप्रतिबंधक लस टोचणे, शरीरातील रक्त बदलण्याची क्रिया करणे, तसेच जीवनसत्त्व क व कैलशियम कॉर्बोनिट इत्यादी औषधांची उपाययोजना त्वरित करणे अत्यावश्यक आहे.
Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली