घोणस (रसेल्स व्हायपर) व्हायपेरा रसेली (Vipera russelli)

विषारी

मराठी : घोणस, कांडर, ठवऱ्या महाडोर..

विशिष्ट लक्षणे : आकाराने मध्यम, पण कधीकधी मोठेही आढळून येतात. शरीराच्या वरच्या भागावर कणेदार खवले, तसेच, लांब आणि गोल गडद रंगाचे ठिपके. डोके त्रिकोणी.

Source Internet

सरासरी लांबी : नर 1 मी. जन्मतः 24 सें. मी.; कमाल : 1.8 मीटर.

वर्णन : घोणस अंगाने जाडगेला असतो. त्याच्या शरीरावर खरबरीत खवले असतात. डोळ्यांतील बाहुली उभी असते. वरील अंगाचा रंग कधी तपकिरी, तर कधीकधी पिवळटही असतो. सर्व अंगावर गहिऱ्या रंगाचे चकचकीत लांब तसेच, गोल ठिपके असतात. या ठिपक्यांच्या कडा पांढऱ्या व काळ्या रंगाच्या असतात. पश्चिम भागात सापडणाऱ्या घोणसाच्या पोटाचा रंग पांढरा असतो. आग्नेय भारतात आढळून येणाऱ्या घोणसाच्या उपजातीच्या पोटावर दाट ठिपके असतात. अंगावरील रंगांतही विविधता असते. जाडगेले शरीर, त्रिकोणी डोके आणि पाठीवरील साखळीप्रमाणे एकमेकांना जोडलेल्या ठिपक्यांवरून त्याची ओळख पटते. घोणस दिसायला निरुपद्रवी मांडवळीसारखे असतात. मांडवळ मात्र आकाराने लहान असून, त्यांची शेपटीही टोकदार नसते. तसेच अंगावरील ठिपक्यांना कसलाही आकार नसतो. पाठीवरील तुकतुकीत व एकसारख्या असलेल्या ठिपक्यांमुळे घोणस व मांडवळांमधील फरक लक्षात येतो. भारतातील चार भयंकर विषारी सर्पात घोणसाची गणना होते. घोणसाची एक मोठी उपजात लेव्हन्टाइन व्हायपर म्हणून ओळखली जाते. तपकिरी वर्णाचा हा जाडगेला साप प्रामुख्याने काश्मीर भागात आढळतो, त्याची वाढ दीड मीटर लांबीपर्यंत होते. वितरण : भारतातील डोंगर व पठारांवर सर्वत्र 3000 मीटर उंचीपर्यंत आढळून येतात.

निवासस्थान : डोंगराळ भागातील उजाड प्रदेशांत, तसेच, शेतीला लागून असलेल्या पठारावरील झुडपी जंगलांत पोणस आढळून येतात. उन्हाळ्यात वाळवीचे वारूळ, तसेच, घुशीच्या बिळांचा आश्रय घेतात. परंतु मोठ्या दगडांतील फटी, पाचोळा, गवत, काटेरी झुडपे व निवडुंगाची बेटे ही त्याची विशेष निवासस्थाने आहेत. केवड्याचे वन व घायपाताची बेटे येथेही ते आढळू येतात.

सवयी : घोणस स्वभावाने सुस्त असला, तरी चवताळला, म्हणजे वेगाने जमिनीवर तिथल्यातिथेच उसळी मारतो. तो जोराने हिस हिस आवाज करुन फूत्कार सोडतो व स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी कडकडून चावतो. स्वभावाने ते भित्रे असतात. नाग व इतर सापांचा माणसाशी जितका संबंध येतो, तितका घोणसाचा येत नाही. इतर साप माणसाला पाहताक्षणी निसटून जातात. रोपवनातील, चहा व कॉफीच्या मळ्यांतील, तसेच, शेतातील कामगारांना घोणसांचा दंश होतो. या क्षेत्रात वावरणाऱ्या कामगारांचा झुडपांत राहणाऱ्या घोणसांना हात लागतो किंवा त्यांच्यावर पाय पडतो. त्यामुळे ते त्यांना दंश करतात.

वीण : मे-जुलै महिन्यांत मादी 20-40 पिलांना जन्म देते. पिलेदेखील अतिशय तेजस्वी असतात; आणि ती जणू मोठ्या सापांच्या प्रतिकृतीच दिसतात.

भक्ष्य : पिंजऱ्यात पकडून ठेवलेल्या लहान घोणसाने स्वजातीय सापांना खाल्ल्याचे आढळून आले. तसेच, इतर जातींचे सर्प, सरडे, उंदीर, जमिनीवरील खेकडे यांवरही ते गुजराण करतात. ते विंचू व इतर कृमिकीटकही खात असावेत. मोठे साप मात्र पूर्णपणे कृंतक प्राण्यांवर उपजीविका करतात. कधीकधी ते पक्षीही पकडून खात असावेत. दक्षिण भारतात ते मुख्यत्वे उड्या मारणाऱ्या जरबिल उंदरांवर गुजराण करतात.

स्थिती : दक्षिण भारतातील कातडी कमावण्याच्या कारखान्यामध्ये घोणसांचे कातडे कमावण्याला विशेष महत्त्व आहे. काही क्षेत्रांत वर्षभर त्यांची कातडी गोळा केली जात असल्याने त्या भागात घोणस आता पूर्णपणे नामशेष होत आहेत.

विष : भारतातील सर्व विषारी सापांमध्ये घोणसाचे विष जहाल समजले जाते. म्हणून रोग्यावर विषप्रतिबंधक लशीचा योग्य प्रमाणात उपचार केला पाहिजे. घोणसाचे अतिजहाल विष रक्तात त्वरित मिसळते, म्हणून रक्तस्राव थांबविण्याकरिता जी औषधे वापरली जातात, त्यांत घोणसाच्या विषाचा उपयोग करतात. तसेच, रक्तविज्ञानाच्या अभ्यासातदेखील घोणसाच्या विद्याला अधिक प्राधान्य दिले जाते.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *