हिवाळ्यात घोणस सापापासून सावधगिरी बाळगा

थंडीची चाहूल लागली की मोठ्या प्रमाणावर घोणस दिसायला लागतात. थंडीचा काळ हा घोणस सापांचा मिलनकाळ असतो.

घोणस सापांचा मिलनकाळ हा सामान्य लोकांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो, त्यामुळे थंडीच्या दिवसात सावधगिरी बाळगा.

Source Internet

घोणस बोजड शरीराचा साप असून जवळपास 3 ते 5 फूट लांबीचा असतो. शरीराच्या मधल्या भागाचा घेर सु. १५ सेंमी. असून शरीर दोन्ही बाजूंना निमुळते होत गेलेले असते. डोके मोठे, चपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे दिसते. डोके व पाठीवर लहान लहान शल्क (खवले) असतात. प्रत्येक शल्कावर उभे आडे (कील) असल्यामुळे घोणसाचे अंग खरबरीत असते. शेपूट लहान असते. पाठीकडचा रंग फिकट ते गडद तपकिरी असून मानेपासून शेपटीपर्यंत मध्यरेषेवर लंबवर्तुळाकार गडद, काळे, भरीव किंवा पोकळ असे २३ ‒ ३० सलग ठिपके असतात. प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते. मधल्या रांगेखेरीज प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे काळ्या ठिपक्यांच्या आणखी दोन रांगा असतात. या दोन्ही रांगांतील ठिपके आकाराने लहान असतात आणि ते सलग नसतात. पोटाचा रंग फिकट पांढरा असून त्यावर रुंद व आडवे पट्टे असतात. जाड शरीर, त्रिकोणी डोके, लहान शेपूट आणि पाठीवरील ठिपक्यांच्या तीन रांगा या विशेषांवरून घोणस चटकन ओळखता येतो. डोळ्यांच्या बाहुल्या उभट व लंबवर्तुळाकार असून त्याभोवतालच्या पडदयावर सोनेरी कण असतात. नाकपुडया मोठया असून त्यातून फुप्फुसातील हवा जोराने बाहेर टाकत तो फुत्कार करतो. फुत्काराचा आवाज मोटारीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाजासारखा असतो. या आवाजादवारे हा त्याच्या शत्रूला अस्तित्वाची जाणीव करून देतो. नर मादीहून काहीसा लांब असतो घोणस सापाचे विषदंत सुमारे १३ मिमी. लांब आणि पोकळ असतात. इतर सापांच्या तुलनेत ते मोठे असतात. तोंड मिटलेले असताना विषदंत जबड्याला समांतर अशा अवस्थेत असतात. दंश करण्यासाठी तोंड उघडल्यावर हाडांची हालचाल होऊन विषदंत जबडयाशी काटकोनात उभे होतात आणि भक्ष्याच्या शरीरात विष टोचले जाते.

उंदीर, बेडूक, सरडे हे घोणसाचे भक्ष्य असल्यामुळे शेतजमिनीत व त्यालगतच्या भागात आणि ग्रामीण भागातील मनुष्यवस्तीतही तो आढळतो. उंदीर, बेडूक, सरडे यांच्या मागावर असल्याने तो शहरी भागातही पुष्कळदा दिसतो. पहाटे व रात्री तो क्रियाशील असतो. तसेच ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसादेखील निर्धास्तपणे वावरतो.

गर्भावधीमध्ये अंडी मादीच्या शरीरातच असतात. अशा प्राण्यांना अंडजरायुज म्हणतात. घोणस मादीला पिले होतात. घोणसाच्या एका मादीने तीन दिवसांत ९६ पिलांना जन्म दिल्याची नोंद आहे.

घोणस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही. माणसाची अगर अन्य शत्रूची चाहूल लागताच शरीराचे वेटोळे करून त्यात डोके दडविण्याकडे त्याचा कल असतो. या वेटोळ्यात तो शरीराच्या पुढच्या एकतृतीयांश भागाला इंग्रजीतल्या ‘S’ अक्षराचा आकार देतो. क्षणार्धात हा भाग सरळ करून तो शत्रूच्या शरीराचा वेध घेऊ शकतो. घोणसाचा दंश झाल्यास त्या ठिकाणी धारदार शस्त्राने जखम करून विषमिश्रित रक्ताचा स्राव करू देण्याची पद्धत अत्यंत चुकीची व जीवघेणी ठरू शकते. हातपायाला दंश झाला असता तात्काळ इस्पितळात नेऊन डॉक्टरांकरवी प्रतिविष टोचणे, हा त्यावर इलाज आहे. विजेच्या चपळाईने तो आक्रमण करू शकतो. नवशिक्या युवकांनी घोणसाला पकडण्याचे धाडस करू नये. घोणसाची ताकद, चपळाई आणि त्याच्या आक्रमणाच्या दिशेची लवचिकता याबद्दलचे अंदाज चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे चूक जीवावर बेतू शकते.

घोणसाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा रक्त कोशिका फुटतात. मुत्राशय निकामी होवु शकते. वैद्यकीय संशोधनात त्याच्या विषाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. ग्रामीण आणि कृषिप्रधान परिसंस्थेत उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारा एक घटक म्हणून घोणसला विशेष महत्त्व आहे.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *