आगी मण्यार (बॅन्डेड् क्रॅट) बंगारस फॅसीएटस (Bungarus fasciatus)

विषारी

मराठी : आगी मण्यार, सोनेरी पट्टचा मण्यार, सतरंज्या साप.

विशिष्ट लक्षणे : साधारणतः मध्यम आकाराचे. कधीकधी मोठेही आढळतात. सर्वांगावर गुळगुळीत आणि चकचकीत खवले. तसेच, पिवळे व काळे रुंद पट्टे.

Source Internet

सरासरी लांबी : 1.5 मी.; जन्मत: 25-30 सें. मी.; कमाल: 2.25 मीटर.

वर्णन : आगी मण्यार जाड व लांब असतो. अंगावर पिवळे व काळे पट्टे असतात. पाठीच्या कण्यावर उंचवटा असतो. शेपटी बोथट असते. डोके गोल असते व ते शरीरापासून स्पष्टपणे वेगळे दिसते. अंगावरील पट्ट्यांचा दोन्ही टोकांचा रंग फिकट होत गेलेला असतो.

वितरण : आसाम, बंगाल, बिहार, ओरिसा, तसेच, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या भागांत आगी मण्यार आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. ते समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत आढळून येतात.

निवासस्थान : पाण्यानजीक असलेल्या वारुळांत व कृतक प्राण्यांच्या बिळांत आगी मण्यार राहतात. कधीकधी ते खेड्यांजवळच्या भागातही आढळतात. कारण त्यांना तेथे त्यांचे भक्ष्य असलेले कृंतक प्राणी व पाणी सहज उपलब्ध होते. उघड्या पठारी भागातही या जातीचे साप विशेषकरून राहतात.

सवयी : इतर मण्यार जातीच्या सापांप्रमाणे दिवसा दडून बसणारे हे साप रात्रीच संचार करतात. आगी मण्यार भित्रे व मवाळ आहेत. सापांना बाळगणारे दिवसा फारशी दक्षता न घेता या सापांना हाताळू शकतात. परंतु रात्रीच्या वेळी या सापांना हाताळणे अशक्य असते. कारण रात्रीच्या वेळी ते अधिक चपळ
बनतात. त्यांना बाळगणाऱ्या लोकांचाच हा अनुभव आहे. भारतातील इतर रात्रिचर सापांप्रमाणेच या सुंदर आगी मण्याराविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे.

वीण : बंगालमधून आणलेल्या आगी मण्याराच्या मादीने मद्रास सर्पोद्यानात 3 एप्रिल रोजी 12 अंडी घातली. एकसष्ट दिवसांनी त्यांपैकी 6 अंड्यांतून पिले बाहेर पडली.

भक्ष्य : आगी मण्यार व मण्यार यांच्या भक्ष्याविषयीच्या सवयी सारख्याच आहेत. ते मण्यार सापांनादेखील खातात. सर्पोद्यानात पकडून ठेवलेल्या या आतीच्या सापांना पाणसाप व लहान घुशी खायला देतात. आगी मण्याराने भक्ष्य तोंडात धरल्यावर दहा-वीस मिनिटांत ते मृत होते. भक्ष्याच्या शरीरात विषाचा संचार होऊन जबड्यातच ते आपोआप गुदमरून जाते.

स्थिती : सामान्य असली, तरी ते क्वचितच दृष्टीस पडतात.

विष : आगी मण्याराचे विष अत्यंत जहरी असते. परंतु ते क्वचितच दंश करतात. त्यांच्या डंख मारण्यामुळे मनुष्यहानी झाल्याचे भारतात तरी आढळून आले नाही. त्यांच्या विषावर भारतात तरी अद्यापपर्यंत प्रतिविष तयार होऊ शकले नाही.. बँकॉक येथील क्वीन साओवभा या संस्थेतच ते उपलब्ध आहे.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *