सोंगट्या साप (ड्रिंकेट स्नेक) एलाफे हेलेना (Elaphe helenal

मराठी : तस्कर सर्प, सोंगट्या साप.

विशिष्ट लक्षणे : मध्यम आकार, वाटोळा, गुळगुळीत, चकचकीत खवले; शरीर फिकट व शेपटी गर्द वर्णाची असते.

सरासरी लांबी : 70 सें. मी.; जन्मत: 25 सें. मी.; कमाल : 1.5 मी.

वर्णन : सोंगट्या सापाचा रंग पिवळट व तपकिरी असतो. त्याच्या मानेपासून शेपटीच्या टोकापर्यंत गर्द रंगाचे दोन पट्टे असतात. पाठीवर काळ्या व पांढऱ्या चकचकीत ठिपक्यांच्या आडव्या रांगा असतात. डोके लांब असते, मात्र त्यावर ठिपके नसतात. बुबुळे गोल असतात. मानेवरून डोक्याकडे जाणारे उलट्या इंग्रजी V आकाराचे दोन पट्टे असतात. शरीराचा खालचा भाग मोतिया रंगाचा असतो. मात्र त्यावर खवले असतात. ते गुळगुळीत व चकचकीत असतात. डोळ्यांजवळ असलेल्या खवल्यांवर सूक्ष्म छिद्रे असतात. त्यांद्वारे त्यांना संवेदना होत असाव्यात. सोंगट्या सापाच्या एकूण नऊ उपजाती आहेत. हा साप स्वभावाने मवाळ असतो. डोंगराळ भागात, तसेच, सपाट प्रदेशातही हिवाळ्यात ते आढळतात.

वितरण : हे भारतात सर्वत्र आढळून येतात. हिरवा सोंगट्या साप अंदमान बेटांवर आणि मैन्ड्रिन सोंगट्या साप हिमालयात 4000 मी. उंचीपर्यंत आढळून येतो. निवासस्थान : सोंगटे साप उन्हाळ्यात वारुळे, दगडांचे ढीग, तसेच, त्यांच्या फर्टीमधून खोलवर जाऊन दडून बसतात. हिवाळ्यात मात्र ते बाहेर पडतात व झाडाझुडपांच्या पानांच्या आश्रयाने राहतात.

सवयी : सोंगटे साप रात्री, तसेच, दिवसा भक्ष्यशोधार्थ फिरताना दिसतात. त्यांना हात लावला असता, काही सोंगटे साप मवाळ व शांत वाटत असले, तरी त्यांतील काही चिडखोरही असतात. ते बिथरले म्हणजे तोंड उघडून व ते किंचित मागे घेऊन हात लावणाऱ्याला दंश करण्याकरिता वेगाने झडप घालतात. काही सोंगटे साप जवळ आलेल्या व्यक्तीला भीती वाटून, ती दूर निघून जावी, म्हणून आपली शेपटी एकसारखी हलवितात व स्वतःचे संरक्षण करतात. या त्याच्या शेपटी हलविण्याच्या क्रियेवरून अमेरिकेतील रॅटल स्नेक (खुळखुळा सर्प) ची आठवण होते.

वीण : मादी 6 ते 8 अंडी घालते. दिसण्यात पिलेदेखील मोठ्या सापासारखीच असतात. त्यांची वीण जवळजवळ वर्षभर होत असते. मद्रास येथील सर्पोद्यानातील सोंगट्या सापाच्या एका मादीने फेब्रुवारीत 8 अंडी घातली व ती एप्रिल महिन्यात उबवली, दुसरीने डिसेंबर महिन्यात तर तिसरीने ऑगस्टच्या अग्रेस अंडी घातल्याचे आढळून आले.

भक्ष्य : अमेरिकेतील धामणीप्रमाणे सोंगट्या सापदेखील प्रामुख्याने कृंतक जातीच्या प्राण्यांवर गुजराण करतो. भक्ष्याभोवती घट्ट विळखा घालून व आवळून तो त्याला मारतो. कधीकधी तो पक्षी आणि त्यांची अंडीही खातो. ह्या सापाची पिले
कृमिकीटक व सरड्याची पिले खातात.

स्थिती: सोंगटे साप कोठेही विपुल प्रमाणात आढळत नाहीत. त्यांना रानात, तसेच, जंगलात ग्रहावयाला आवडते. जंगले साफ करून त्यांचा शेतीसाठी उपयोग केल्यामुळे या सापांवर त्याचा काहीही प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येत नाही. आकाराने मोठे व सुंदर असलेले हे साप विपुल प्रमाणात आढळून येत नाहीत. त्यामुळे त्यांची कातड्यांसाठी हत्या होणे योग्य वाटत नाही.

टीप : सापांना पकडण्याचा व्यवसाय करणारे इरुलांसारखे आदिवासी देखील गैरसमजुतीमुळे हे साप विषारी असल्याचे समजतात.

Source: Internet, आपल्या भारतातील साप रेमुलस विटेकर अनुवाद मारुती चितमपल्ली.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *